त्या कटकारस्थानी पोलीस अधिकाऱ्याची अखेर उचल बांगडी
संगमनेर कर नागरिकात समाधान
प्रवरातीर | वृतसेवा संगमनेर प्रतिनिधी-संगमनेर शहरातील एमडी ड्रग्ज प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, काही माध्यमांनी सुरुवातीपासून या प्रकरणातील वास्तव परिस्थिती मांडल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली असून, अखेर दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी श्रीरामपूरच्या अपर अधीक्षकांच्या गोपनीय अहवालावरून वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांची संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून उचलबांगडी करण्यात आली असून त्यांना नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले आहे. या कारवाईमुळे प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.
संगमनेर शहरात जुन्या वादातून एका निष्पाप तरुणाला ड्रग्ज प्रकरणात अडकविण्यासाठी कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात काशिफ कुरेशी यांच्या दुचाकीच्या डिकीत ३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज ठेवण्यात आल्याचा आरोप असून, त्यानंतर पोलिसांना माहिती देऊन कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कारवाई केल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणातील घटनाक्रमाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी पुढे आली.
या प्रकरणाचा तपास सुरुवातीला श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या देखरेखीखाली होता. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास अहिल्यानगरच्या एलसीबीकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान ड्रग्जचा साठा कुठून आला, तो संबंधित तरुणाच्या दुचाकीपर्यंत कसा पोहोचला आणि या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
या प्रकरणात तौसीब कुरेशी आणि त्याचे साथीदार यांच्याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. दुचाकीच्या डिक्कीत ड्रग्ज ठेवणाऱ्या व्यक्तींची भूमिका तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा शोध तपास यंत्रणेला घ्यावा लागणार आहे.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांना संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून नियंत्रण कक्षात जमा करण्यात आल्याने वरिष्ठ पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या प्रकरणातील संपूर्ण घटनाक्रमाची उच्चस्तरीय चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येते का, याकडे संगमनेर तालुक्याचे लक्ष लागले आहे.






Total Users : 192588