spot_img
spot_img
spot_img
spot_img

एलसीबी, शहर पोलिसांच्या कारवायांनंतरही अवैध धंदे पुन्हा जोमात ! गुटखा-मावा, वाळू , पत्त्योचे अड्डे, गांजा व अमली पदाथांच्या कथित व्यवहारांवर नागरिकांचा संताप; पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह

एलसीबी, शहर पोलिसांच्या कारवायांनंतरही अवैध धंदे पुन्हा जोमात !

गुटखा-मावा, वाळू , पत्त्योचे अड्डे, गांजा व अमली पदाथांच्या कथित व्यवहारांवर नागरिकांचा संताप; पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह

प्रवरातीर | वृतसेवा

संगमनेर प्रतिनिधी-संगमनेर शहर व तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात एलसीबी आणि शहर पोलिसांकडून कारवाया होत असतानाच काही दिवसांतच पुन्हा कथित अवैध व्यवसाय सुरू होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे कारवाई होते तरी अवैध धंदे पुन्हा सुरू कसे होतात? असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.शहरातील विविध भागांत गुटखा-मावा विक्री, बेकायदा वाळू वाहतूक, पत्त्यांचे अड्डे, गांजा तसेच अमली पदार्थांच्या कथित विक्रीबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे. काही ठिकाणी संबंधित व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याचा दावा केला जात असून, यामुळे पोलीस प्रशासनाच्या कारवाईच्या सातत्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

कारवाई फक्त कागदावर की प्रत्यक्षात?

अवैध धंद्यांवर छापे टाकून गुन्हे दाखल केले जातात; मात्र त्यानंतर काही काळातच त्याच प्रकारचे व्यवसाय पुन्हा सुरू होत असल्यास, या धंद्यांच्या मुळाशी असलेल्या पुरवठादारांवर आणि सूत्रधारांवर कारवाई का होत नाही? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.

विशेषतः अमली पदार्थ आणि गांजासारख्या पदार्थांच्या कथित व्यवहारामुळे तरुण पिढीच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता पुरवठ्याची संपूर्ण साखळी शोधून काढण्याची गरज आहे.

एलसीबी आणि शहर पोलिसांसमोर आव्हान

अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी विविध पथके कार्यरत असताना त्याच धंद्यांना पुन्हा उधाण येत असेल, तर स्थानिक पातळीवर पोलिसांची गुप्त माहिती यंत्रणा नेमकी किती प्रभावी आहे? हा प्रश्नही चर्चेत आला आहे.

संगमनेर शहरातील कोणकोणत्या भागात अशा प्रकारचे व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी आहेत, याची सखोल माहिती घेऊन संबंधित यंत्रणांनी तपास करणे आवश्यक आहे. तसेच अवैध धंद्यांना संरक्षण किंवा मदत मिळत असल्याच्या तक्रारी असल्यास त्याचीही स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे.

नागरिकांची मागणी : ‘मूळावर घाव घाला!’

अवैध धंदे बंद करण्यासाठी अधूनमधून होणाऱ्या कारवायांपेक्षा सातत्यपूर्ण मोहीम, नियमित गस्त आणि पुरवठा साखळीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

संगमनेर शहराला अवैध धंद्यांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रशासन आता ठोस पावले उचलणार का?की कारवाईनंतर पुन्हा सुरू होणाऱ्या या धंद्यांचा खेळ असाच सुरू राहणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कारवाईचा धाक की अवैध धंद्यांना मोकळे रान?

एकीकडे एलसीबी आणि शहर पोलिसांकडून कारवायांचा दावा केला जात असताना दुसरीकडे अवैध धंदे पुन्हा सुरू होत असल्याच्या तक्रारी समोर येत असतील, तर या कारवायांचा नेमका परिणाम काय? हा प्रश्न संगमनेरकरांना पडणे स्वाभाविक आहे.गुटखा, वाळू, पत्त्यांचे अड्डे, गांजा आणि अमली पदार्थांच्या कथित व्यवहारांवर केवळ अधूनमधून छापे टाकून प्रश्न सुटणार नाही. अवैध धंद्यांचे विक्रेतेच नव्हे, तर त्यामागील पुरवठादार, सूत्रधार आणि आर्थिक साखळी शोधून काढण्याची गरज आहे.

संगमनेरकर आता कारवाईच्या घोषणांपेक्षा प्रत्यक्ष परिणामाची वाट पाहत आहेत. अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई होणार का, तसेच कारवाईनंतर हे धंदे पुन्हा उभे राहू नयेत यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी केली जाणार का, हा खरा सवाल आहे.कारवाई झाली म्हणून प्रश्न संपत नाही; कारवाईनंतर अवैध धंदे पुन्हा सुरू होऊ नयेत, तेव्हाच पोलिसांच्या कारवाईला खरा अर्थ प्राप्त होईल. आता संगमनेरकरांच्या नजरा पोलिसांच्या पुढील भूमिकेकडे लागल्या आहेत.

spot_img

Related Articles

संगमनेरला १०२ कोटींच्या विविध विकासकामांचा आज शुभारंभ व लोकार्पण   पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ त्यांची प्रमुख उपस्थिती 

संगमनेरला १०२ कोटींच्या विविध विकासकामांचा आज शुभारंभ व लोकार्पण   पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ त्यांची प्रमुख उपस्थिती  संगमनेर : प्रतिनिधी  संगमनेर तालुक्यातील विविध विकासकामांना...

त्या कटकारस्थानी पोलीस अधिकाऱ्याची अखेर उचल बांगडी संगमनेर कर नागरिकात समाधान

त्या कटकारस्थानी पोलीस अधिकाऱ्याची अखेर उचल बांगडी संगमनेर कर नागरिकात समाधान प्रवरातीर | वृतसेवा संगमनेर प्रतिनिधी-संगमनेर शहरातील एमडी ड्रग्ज प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!