संगमनेर/ प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. तालुक्यातील पेमगिरी , कुरकुंडी व कोठे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसाठी नवीन पदस्थापना
निर्मितीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, तत्पर आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
याबाबत आमदार अमोल खताळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यशासनाने ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित तसेच श्रेणीवर्धित प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत तालुक्या तील पेमगिरी,कुरकुंडी व कोठे बुद्रुक आणि या उपकेंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.
आमदार खताळ यांनी या तीनही आरोग्य उपकेंद्रांमध्ये आवश्यक पदनिर्मिती करण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळण्यात येणाऱ्या अडचणी, वाढती लोकसंख्या आणि आरोग्य सुविधांची गरज याकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले होते. निवेदन दिल्यानंतरही त्यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करत शासन स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला.
आमदार खताळ यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करत आरोग्यमंत्री आबिटकर यांनी राज्यातील विविध प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसाठी पदनिर्मितीला मंजुरी दिली. त्यामध्ये तालुक्यातील पेमगिरी 15 ,कुरकुंडी 4 व कोठे बुद्रुक 4 अशाप्रकारे तीन उपकेंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. मंजूर करण्यात आलेल्या पदांमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सहाय्यक परिचारिका, औषध निर्माता, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्त्री आरोग्य सहाय्यक, पुरुष आरोग्य सहाय्यक, परिचर, वाहनचालक तसेच सफाईगार आदी पदांचा समावेश आहे. या पदांच्या भरतीमुळे आरोग्य उपकेंद्रांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार असून रुग्णांना विविध सेवा एकाच ठिकाणी मिळण्यास मदत होणार आहे
या निर्णयामुळे पेमगिरी ,कुरकुंडी व कोठे बुद्रुक, तसेच परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना दिलासा मिळाला असून आरोग्य सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, या मागणीला मंजुरी दिल्याबद्दल आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे विशेष आभार मानले आहेत.





